मुंबई प्रतिनिधी
टी-२० विश्वचषक २०२६ च्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. दक्षिण आफ्रिकेने दिलेले १७० धावांचे आव्हान न्यूझीलंडने अवघ्या १२.५ षटकांत केवळ एका गडीच्या मोबदल्यात पार केले.
न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ऍलन याने तुफानी फलंदाजी करत ३३ चेंडूत नाबाद १०० धावांची खेळी साकारली. ३०३.०३ च्या स्ट्राईक रेटने खेळताना त्याने १० चौकार आणि ८ षटकारांची आतषबाजी केली. त्याला टीम सायफर्टनेही दमदार साथ दिली. सायफर्टने ३३ चेंडूत ५८ धावा करत ७ चौकार आणि २ षटकार ठोकले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९.१ षटकांत ११७ धावांची भागीदारी केली.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत ८ बाद १६९ धावांपर्यंतच मजल मारता आली.
दक्षिण आफ्रिकेच्या डावात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्को यानसनने ३० चेंडूत नाबाद ५५ धावा करत झुंजार खेळी केली. तर डेवाल्ड ब्रेविसने ३४ आणि ट्रिस्टन स्टब्जने २९ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री, रचिन रवींद्र आणि कोल मॅककोनची यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर लॉकी फर्ग्युसन आणि जिमी नीशम यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामागे खराब क्षेत्ररक्षणही कारणीभूत ठरले. डावाच्या आठव्या चेंडूवर टीम सायफर्टने हवेत फटका मारला असता यष्टीरक्षक क्विंटन डिकॉक आणि डेवाल्ड ब्रेविस यांच्यात गोंधळ झाला. परिणामी सोपा झेल सुटला आणि सायफर्टला जीवदान मिळाले. त्यानंतर त्याने संधीचा फायदा घेत न्यूझीलंडच्या विजयाची पायाभरणी केली.
या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने गट टप्प्यातील चार आणि सुपर-८ मधील तीन असे सलग सात सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली होती. मात्र उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.
दरम्यान, न्यूझीलंडने अंतिम फेरीत प्रवेश केला असून भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेता संघ ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडशी अंतिम सामना खेळणार आहे.


