
मुंबई प्रतिनिधी
मुंबई | 2020 आणि 2021 साली जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या लाटेनंतर सध्या भारतात स्थिती नियंत्रणात आहे. सध्या देशात कोरोनाचे केवळ 93 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती केंद्र सरकारच्या वेबसाईटनुसार समोर आली आहे. मात्र, आरोग्य प्रशासन सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या महिन्याकाठी मुंबईत सुमारे 8 ते 9 कोरोना रुग्ण आढळत आहेत. शनिवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दोन रुग्ण आढळून आले. जरी ही संख्या चिंताजनक नसली तरी शहरातील तापाचे रुग्ण आणि सर्दी-खोकल्याच्या तक्रारींवर लक्ष ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
दरम्यान, सिंगापूरमध्ये मात्र कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तेथील आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 28 टक्क्यांनी वाढून 14,200 वर पोहोचली आहे. याशिवाय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली आहे.
कोरोना पूर्णतः गेलेला नसून तो आपल्या समाजात अधूनमधून डोके वर काढणार, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे, स्वच्छता पाळणे आणि लक्षणं आढळल्यास तातडीने तपासणी करून घेणे आवश्यक आहे.