
डोंबिवली प्रतिनिधी
डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी औद्योगिक विभागातील पोलिस वसाहतीची दोन इमारती सध्या भग्नावस्थेत असून, या ठिकाणी दारुड्यांचा अड्डा झाल्याचे समोर आले आहे. कोरोनानंतर या इमारती धोकादायक ठरल्याने येथे राहणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कुटुंबीयांनी घर रिकामे करून अन्य ठिकाणी स्थलांतर केले होते. त्यामुळे गेल्या चार-पाच वर्षांपासून ही वसाहत ओस पडली आहे.
या रिकाम्या आणि सुनसान इमारतींमध्ये रात्रीच्या वेळी दारुडे दारू पित असल्याने या ठिकाणी अनुचित घटना नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे. मनसे विभाग अध्यक्ष संजय चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा ढीग, कचरा, झाल्याने दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे
“पूर्वी बावन्नचाळ परिसरातही अशीच स्थिती होती. तेथील रिकाम्या बंगल्यांचा गैरफायदा समाजकंटक घेत होते. त्यामुळे तिथे पोलिसांना अनेक घटनांचा सामना करावा लागला होता. तशीच परिस्थिती येथे उद्भवू नये,” असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकारी संजय चव्हाण, श्याम पिसके, शरद कोंढारकर, अजय घोरपडे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी वसाहतीत भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मानपाडा पोलिस निरीक्षक विजय कादबाणे यांना या बाबत माहिती दिली असून, या परिसरात तातडीने जाळी किंवा पत्रे लावून प्रवेशबंदी करण्याची मागणी केली आहे.