मुंबई प्रतिनिधी
मुंबई| ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काही तरुणांनी धोकादायक स्टंटबाजी करत सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत तीन जणांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे अदनान मोहम्मद इसा खान (२०), मुकीम बशीर खान (२२) आणि जुनैद अवद अली खान (२०) अशी आहेत. हे तिघेही मूळचे उत्तर प्रदेशातील असून सध्या मुंबईत टॅक्सी चालक म्हणून काम करत आहेत. त्यांच्याविरोधात आरसीएफ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम ३(५), तसेच कलम २८१ आणि १२५ आणि मोटार वाहन कायद्यानुसार कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये स्टंट करताना, तर काहीजण गाडी चालू असताना बाहेर डोकावताना दिसून येत आहेत. ही कृती केवळ कायद्याचे उल्लंघन करणारी नाही, तर ती नागरिकांच्या जिवितास धोका पोहोचवणारी असल्यामुळे ती अत्यंत गंभीर मानली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला असून, या प्रकारात सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबई पोलीस विभागाने अशा प्रकारच्या बेजबाबदार आणि धोकादायक वर्तनाविरुद्ध कारवाई करत नागरिकांच्या सुरक्षेची गांभीर्याने दखल घेतली आहे.


