नागपूर प्रतिनिधी
नागपूर : राज्यातील मुद्रांक शुल्क विभागाची ६० कार्यालये पासपोर्ट कार्यालयांच्या धर्तीवर आधुनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यालयांमध्ये शासकीय अधिकारी कार्यरत राहणार असून, पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाच्या व्यवस्थेसाठी खासगी सहभाग घेतला जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
नोंदणी विभागातील सेवा अधिक आधुनिक, गतिमान आणि तंत्रज्ञानाधारित करण्यावर शासनाचा भर असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. नागरिकांना नोंदणी कार्यालयात येताना भेडसावणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर वाढविण्यात येत आहे.
दरम्यान, या कार्यालयांमध्ये शासकीय अधिकारी कायम ठेवून पायाभूत सुविधा व इतर मनुष्यबळासाठी खासगी सहभाग घेण्याच्या निर्णयामुळे शासकीय सेवांच्या व्यवस्थापनात खासगी सहभागाचा मुद्दा चर्चेत आला आहे. उपलब्ध माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात ६० कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.
दुष्काळी परिस्थितीबाबत पंतप्रधानांची भेट घ्यावी
राज्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती केंद्र सरकारसमोर मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची गरज असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. केंद्र सरकारने यापूर्वी दुष्काळाच्या परिस्थितीत राज्यांना मदत केली आहे. त्यामुळे पंतप्रधानांची भेट घेतल्यास राज्याच्या परिस्थितीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
‘एसआयआर’ प्रक्रियेबाबत विरोधकांवर आरोप
मतदार यादीतील नाव कमी-जास्त झाले असल्यास किंवा नाव नोंदवायचे राहिले असल्यास संबंधितांना त्याची नोंद करून घेण्याची संधी उपलब्ध असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. यासाठी ३० तारखेपर्यंत मुदत असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व पक्षांचे बूथस्तरीय पदाधिकारी या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
मात्र, विरोधकांकडून जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करून ‘एसआयआर’ प्रक्रियेला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. निवडणूक आयोगाची भेट हा राजकीय स्टंट असल्याचेही त्यांनी म्हटले.
मोदींवरील टीकेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करणे किंवा त्यांच्यावर अशा पद्धतीने टीका करणे योग्य नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांनी भारताची जागतिक पातळीवरील प्रतिमा उंचावली असून, विविध देशांनी त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका करताना संयम बाळगण्याची गरज असल्याचे बावनकुळे म्हणाले. अशा प्रकारची टीका जनता सहन करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

