मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) २०२६ अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीतील नाव किंवा नोंदींबाबत नागरिकांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. नागरिकांनी नमुना क्रमांक ६, ७ आणि ८ योग्य पद्धतीने व निर्धारित कालावधीत भरून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.
बृहन्मुंबईतील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी २२ सप्टेंबर २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत चोक्कलिंगम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुनरीक्षण प्रक्रियेबाबत आवश्यक सूचना दिल्या.
दरम्यान, नागरिकांना मतदार यादीशी संबंधित सेवा सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये पदनिर्देशित ठिकाणी विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.
या बैठकीला अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई शहर जिल्हा) आंचल गोयल, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई उपनगर जिल्हा) सौरभ कटियार, उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र) मनोहर पारकर आणि सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

