सातारा : प्रतिनिधी
सातारा : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि मिरवणुकीदरम्यान नागरिकांची सुरक्षितता राखली जावी, यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३४ अंतर्गत याबाबत अधिसूचना जारी केली आहे. हे वाहतूक निर्बंध २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर राजवाडा, मोती चौक, देवी चौक, कमानी हौद, शेटे चौक, शनिवार चौक, मोती चौक, राधिका चौक, बुधवार नाका ते विसर्जन तळे या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश तसेच पार्किंगला बंदी राहणार आहे. या परिसरातील रहिवाशांनीही आपली दुचाकी व चारचाकी वाहने पर्यायी ठिकाणी उभी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कमानी हौद ते शेटे चौक, शेटे चौक ते शनिवार चौकमार्गे मोती चौक, तसेच मोती चौक ते एमएसईबी कार्यालय, समर्थ टॉकीज, राधिका टॉकीज चौक, ऐक्य प्रेस कॉर्नर, बुधवार नाका, कृत्रिम विसर्जन तलाव ते कै. किसन बा. आंदेकर चौक आणि करंजे पेठ या मार्गांवरही वाहतूक बंद राहणार आहे. मोळाचा ओढा ते बुधवार नाका या मार्गावरील शाहूपुरी पोलीस ठाणे ते बुधवार नाका दरम्यानची वाहतूकदेखील बंद ठेवण्यात येणार आहे.
सज्जनगड-कासकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग
बोगदा-समर्थ मंदिर ते शाहू चौक हा मार्ग हलकी व अवजड वाहने तसेच एसटी बससाठी बंद राहणार आहे. सज्जनगड आणि कास पठाराच्या दिशेने जाणाऱ्या तसेच तेथून येणाऱ्या वाहनांसाठी गोडोली नाका, शिवराज पेट्रोलपंप, खिंडवाडी, शेंद्रे-सोनगाव फाटा आणि बोगदा या मार्गाचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कास-यवतेश्वर तसेच सज्जनगड, सोनगाव फाटामार्गे शहराकडे येणाऱ्या वाहनांनी शेंद्रे-शिवराज मार्गाचा वापर करावा, असे पोलिसांनी कळविले आहे. मोळाचा ओढा मार्गे शहरात येणारी वाहने महानुभव मठ, करंजे आणि भूविकास बँक चौक मार्गे पुढे जातील. कोटेश्वर मंदिर ते राधिका टॉकीज चौक या मार्गावरील वाहतूकही पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
दोन ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था
गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी तालिम संघाजवळील मैदान आणि कोटेश्वर मैदान येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर कोणत्याही प्रकारे वाहने पार्क करता येणार नाहीत.
रुग्णवाहिका, पोलीस वाहने आणि अग्निशामक दलाच्या वाहनांना या वाहतूक निर्बंधातून वगळण्यात आले आहे. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडण्यासाठी नागरिकांनी वाहतूक बदलांची माहिती घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.

