मुंबई प्रतिनिधी
मुंबई : श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाढणारी प्रवासी आणि भाविकांची गर्दी लक्षात घेऊन महापौर श्रीमती रितू तावडे यांनी २२ सप्टेंबर २०२६ रोजी घाटकोपर मेट्रो स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानकातील विविध नागरी सुविधा आणि प्रवाशांसाठीच्या व्यवस्थेचा आढावा घेत नागरिकांशी थेट संवाद साधला.

घाटकोपर मेट्रो स्थानक परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेची महापौरांनी पाहणी केली. मेट्रो प्रशासनाकडून प्रवाशांना मिळणाऱ्या दैनंदिन सुविधांबाबतही त्यांनी प्रवाशांकडून माहिती घेतली.
प्रवाशांनी मांडलेल्या सूचना आणि समस्यांची माहिती घेतल्यानंतर प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या. गणेशोत्सव तसेच गर्दीच्या वेळेत स्थानकावरील गर्दीचे नियोजन कशा पद्धतीने केले जाते, याचीही त्यांनी माहिती घेतली.
यावेळी मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत मेट्रो संचालन, प्रवासी संख्या, सध्याचे तिकीट दर आणि भविष्यात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मेट्रो कोचेसची संख्या वाढविण्याच्या नियोजनाबाबत माहिती घेण्यात आली. तसेच मेट्रोच्या महसूल उत्पन्नाचे विविध स्रोत आणि महसूल वाढीसाठी करण्यात येणाऱ्या नियोजनावरही चर्चा झाली.
मेट्रो प्रशासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक सहकार्य देण्यात येईल, असे महापौर रितू तावडे यांनी यावेळी सांगितले.
या पाहणीवेळी मेट्रोचे व्यवसाय प्रमुख अजय कुमार, उपमहाव्यवस्थापक मयंक रावत आणि वरिष्ठ व्यवस्थापक अल्पेश नागदा यांच्यासह संबंधित तांत्रिक व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागाचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र हांगे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते.

