
बिड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे.
बारावीच्या परीक्षेच्या काळातच संतोष देशमुख यांची हत्या झालेली असल्याने त्यावेळी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्याच परिस्थितीत वैभवीने 12वी ची परीक्षा दिली होती. आज निकाल असल्याने वैभवी वडिलांच्या आठवणीने भावुक झाली. माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला आज माझे वडील नाही, याचं दु:ख होतं, असं यावेळी वैभवी म्हणाली. माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच लागेल अशी भावना देखील यावेळी तीने व्यक्त केली.
वडिलांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्रभर आंदोलन करणाऱ्या वैभवी देशमुखने बारावीमध्ये मोठे यश संपादन करू तब्बल 85.33 टक्के गुण मिळवले आहेत.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने महाराष्ट्राचे राजकीय तसेच सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. या भयंकर हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येने कुटुंबीय हादरले असतानाच त्यांची कन्या वैभवी देशमुख बारावीची परीक्षा देत होती. त्यामुळे तिच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बारावीच्या परीक्षेत वैभवी देशमुखने 85.33 टक्के इतके मार्क्स मिळवलेत. वडिलांच्या मृत्यूचे आभाळाएवढं दुःख घेऊन वैभवीने परीक्षा दिली. या परीक्षेत तिने घवघवीत यश संपादन केले. या निकालानंतर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आपल्या डोक्यावरील पितृछत्र हरवल्यानंतर वडिलांना न्याय मिळावा यासाठी आपले चुलते धनंजय देशमुख यांच्यासोबत वैभव महाराष्ट्रभर फिरत होती. नेत्यांच्या गाठीभाठी घेत त्यांना आपल्याला न्याय देण्याची विनंती करत होती. डिसेंबरमध्ये तिच्या वडिलांच्या हत्या झाली तेव्हापासून ती न्याय मागत होती. आंदोलन करत होती. या काळात तिचा नीटसा अभ्यासही झाला नाही.
तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की तिचा अभ्यासात मनच लागत नाही. पावलोपावली आपल्या वडिलांची आठवण येते. मात्र आधी मला या कठीण परिस्थितीमध्ये देखील परीक्षा द्यायची आहे आणि नीट देखील पास करायची आहे असे म्हटले होते. त्याचीच प्रचिती म्हणून आज बारावीच्या परीक्षेत तिने यश संपादन केले आहे.
दरम्यान. या परीक्षेत वैभवी देशमुखला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. यात इंग्रजी विषयात 63, मराठीत 83, गणितामध्ये 94, फिजिक्समध्ये 83, केमेस्ट्रीत 91 आणि बायोलॉजी विषयात 98 गुण मिळाले आहेत. तिला एकूण 600 पैकी 512 गुण मिळाले आहेत.