
नवी दिल्ली वृत्तसंस्था
जम्मू काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. यावेळी जाणून बुजून हिंदू पर्यटकांना ठार मारण्यात आले. यासाठी त्यांच्या पॅन्ट काढण्यात आल्या, कलमा वाचण्यास सांगण्यात आले एवढेच नाही तर त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये त्यांची नावे तपासण्यात आली.
तुम्ही मोदीला डोक्यावर चढवून ठेवले आहे, असे हे दहशतवादी यावेळी म्हणत होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून मोठी लष्करी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पीओकेमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली असून आरोग्य कर्मचार्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द केला आहे. त्यामुळे सिंधू नदीत भारताकडून सोडण्यात येणारे पाणी थांबवण्यात आले आहे. तसेच भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. भारतातील पाकिस्तानी दुतावास बंद करण्यात आले आहे. अटारी सीमा बंद करण्यात आली आहे. काश्मिरातील सीमेवर दोन्ही सैन्याकडून तुरळक गोळीबार सुरु असला तरी अद्याप मोठी कारवाई करण्यात आलेली नाही.
दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून केली उद्ध्वस्त
पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची घरे भारतीय लष्कराच्या जवानांनी स्फोटके लावून उडवली आहेत. एकूण ९ दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके लावण्यात आली की दूरपर्यंत आवाज ऐकायला आला. एवढेच नव्हे तर परिसरातील घरांनाही भेगा पडल्या. त्यामुळे दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांना शरण येण्याचे आवाहन केले आहे.
मीडियासाठी जाहीर केली अॅडव्हायझरी
केंद्र सरकारने मीडियासाठी अॅडव्हायझरी काढली आहे. त्यामुळे कोणत्याही लष्करी कारवाईच्या थेट प्रक्षेपणापासून मीडियाने दूर राहावे असे सांगण्यात आले आहे. तसेच या घटना कव्हर करताना तारतम्य बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मीडिया कव्हरेजची दहशतवाद्यांना मदत झाली होती. त्यामुळे असे काही होऊ नये असा सरकारचा उद्देश आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या पहिल्या मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी या घटनेचा केवळ ओझरता उल्लेख केला आहे. इतर देशांमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी केवळ तोच विषय घेऊन जनतेला संबोधित केले. परंतु, मोदींनी तसे केले नाही. त्यांना कदाचित दहशतवाद्यांचे लक्ष विचलित करुन मोठी लष्करी कारवाई करायची असेल असे सांगितले जात आहे.