
नवी दिल्ली वृत्तसंस्था
येत्या काही दिवसांत तुम्हाला गाड्यांच्या हांँर्नचे आवाज बदलले ऐकावयास मिळणार आहेत.
नंबर प्लेटनंतर आता तुमच्या गाडीचा हॉर्न बदलणार आहे. यापुढे कार किंवा दुचाकीचा हॉर्न वाजवला की बासरी, तबला, हार्मोनियम किंवा व्हायोलिनसारखा भारतीय वाद्यांचा आवाज ऐकू येईल.
केंद्र सरकार अशा कायद्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे वाहनांचे हॉर्न अधिक आनंददायी आणि भारतीय संस्कृतीशी सुसंगत असतील.
ही माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली असून, ते एका वृत्तपत्राच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी सांगितलं की, वाहनांचे हॉर्न पारंपरिक भारतीय वाद्यांवर आधारित असावेत, यासाठी कायदेशीर पावलं उचलण्याचा विचार सरकार करत आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, ‘देशातील वायू आणि ध्वनी प्रदूषणात वाहतूक क्षेत्राचा मोठा वाटा आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. हॉर्नचा आवाज कमी करत त्याला सांस्कृतिक रूप देण्याचाही यात समावेश आहे.’ त्याचबरोबर, ग्रीन फ्युएल वापरणाऱ्या वाहनांना सरकारचा प्रोत्साहन मिळत आहे, ज्यात इथेनॉल, मिथेनॉल आणि जैवइंधन यांचा समावेश आहे.
गडकरींनी सांगितलं की, ‘भारताने आता जपानलाही मागे टाकलं असून, अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ बनली आहे.’ 2014 मध्ये भारताचं ऑटो क्षेत्र 14 लाख कोटींचं होतं, जे 2025 मध्ये वाढून 22 लाख कोटी रुपये झालं आहे. यामुळे भारत दुचाकी आणि कारच्या निर्यातीतून सर्वाधिक महसूल मिळवणारा देश ठरला आहे.
सरकारचं म्हणणं आहे की, हॉर्नचा आवाज फक्त इशारा देणारा नसावा, तर तो कर्णसुखद असावा. त्यामुळे वाहनांच्या आवाजामुळे होणारं मानसिक त्रास आणि ध्वनी प्रदूषण कमी होईल, असा सरकारचा विश्वास आहे. यामुळे भारतातील वाहतूक अनुभव अधिक सुखकर होईल, असंही गडकरींनी सांगितलं.