
सातारा प्रतिनिधी
ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल साताऱ्यातील पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाटणे म्हणाले, “साताऱ्यातील पत्रकारितेमध्ये आम्ही मैत्रीच्या भावनेतून माणसे उभी केली आहेत. विनोद कुलकर्णी यांची निवड हा साताऱ्याचा अभिमान आहे. साताऱ्याला साहित्यिक वारसा लाभलेला असल्याने येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे. जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही पत्रकारांसाठी सदैव सहकार्य करत आलो असून, संघाची उभी केलेली वास्तू ही राज्यात इतरत्र नाही, हे आमच्यासाठी गौरवाचे आहे.”
सत्कारमूर्ती विनोद कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “साहित्य क्षेत्राशी माझे जुने नाते आहे. पत्रकारितेत काम करताना मिळालेल्या अनुभवामुळे मला ही संधी मिळाली. हरीष पाटणे यांनी कायमच माझ्या पाठीशी उभं राहून पाठिंबा दिला. 15 जिल्ह्यांमध्ये मी पहिलाच महामंडळाचा पदाधिकारी आहे, हाच साताऱ्याचा गौरव आहे. 1993 नंतर साताऱ्यात साहित्य संमेलन झालेले नाही, ते येथे व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, दिनकर झिंब्रे, श्रीकांत कात्रे, तुषार भद्रे यांची मनोगते झाली. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, राहूल तपासे, दीपक माने, जितेंद्र जगताप, चंद्रकांत देवरुखकर, प्रमोद इंगळे यांच्यासह सातार्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.