
सातारा प्रतिनिधी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) च्या परीक्षेच्या निकालात महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांनी बाजी मारली आहे. परळी (ता. सातारा) येथील प्रणव विनय कुलकर्णी याने देशात २५६ व्या क्रमांकासह घवघवीत यश मिळवले आहे, तर कऱ्हाड येथील अंकिता अनिल पाटील हिने ३०३ वा क्रमांक पटकावला.
त्यांच्या या ऐतिहासिक यशाने कुटुंबीयांवर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रणव कुलकर्णी याने याआधी २०२१ मध्ये यूपीएससी सीडीएससी परीक्षेत देशात सहावा क्रमांक, तर २०२२ मध्ये पाचव्या क्रमांकावर मोहोर उमटवली होती. त्याची वायू दलात फायटर पायलट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, काही वैद्यकीय कारणास्तव तो रुजू झाला नाही. त्यानंतर त्याने २०२४ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २५६ वी रॅंक मिळवून बाजी मारली. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्याचे वडील विनय कुलकर्णी हे महावितरण कंपनीच्या सातारा येथील कार्यालयात ऑपरेटर म्हणून नोकरीस आहेत, तर आई रोहिणी या गृहिणी आहेत. त्याचे प्राथमिक शिक्षण एसएमएस स्कूलमध्ये, माध्यमिक शिक्षण पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा येथे झाले. त्यानंतर सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून आयटी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. यूपीएससीतील यशानंतर लहानपणापासून त्याने बाळगलेले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
कऱ्हाड येथील अंकिता पाटील हिने यूपीएससी परीक्षा सामान्य प्रवर्गातून यशस्वीरीत्या उत्तीर्ण करत देशात ३०३ वा क्रमांक पटकावला. तिने आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण मुंबईतील के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून (आयटी) पूर्ण केले. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षांची तयार सुरू केली. त्यात तिला यश मिळाले. तिचे वडील अनिल पाटील हे सध्या मुंबई येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर आई अर्चना पाटील या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत आहेत. अंकिता ही केवळ अभ्यासात नव्हे, तर कलेत आणि क्रीडा क्षेत्रातही आघाडीवर आहे. ती राष्ट्रीय स्तरावरील स्क्वॉश खेळाडू आहे, तसेच कथ्थक नृत्य प्रकारात ती प्रशिक्षित नृत्यांगणाही आहे. विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. तिच्या यशानंतर सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
“ही परीक्षा माझ्यासाठी केवळ करिअर नव्हे, तर समाजासाठी काहीतरी करण्याची संधी आहे. माझ्या आई-वडिलांचा, गुरुजनांचा आणि मित्रपरिवाराचा मला सतत आधार मिळाला, त्यामुळे हे यश शक्य झालं. -अंकिता पाटील
“लहानपणापासून देशसेवा करण्याची इच्छा होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना मी स्वतः झोकून दिले होते. दररोज आठ-नऊ तास अभ्यास करत तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. कुटुंबीयांच्या प्रेरणेमुळे ही यशाची उंची गाठली आहे.
-प्रणव कुलकर्णी