
पालघर प्रतिनिधी
महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. अशातच आता महाराष्ट्रात नविन धरण बांधले जाणार आहे.
खास मुंबईकरांसाठी हे नवीन धरण बांधण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेचा हा 31050000000 रुपयांचा महाप्रकल्प आहे.
मुंबईवरील पाणीबाणी सोडवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या गारगाई धरण प्रकल्पाला अखेर राज्य मंत्रिमंडळाकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे . या प्रकल्पासाठी लागणाऱ्या वन्यजीव आणि पर्यावरण विषयक बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिलीय. यामुळे येत्या काळात मुंबईकरांना अधिकचा पाणीपुरवठा होणार आहे.
मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा म्हणून पालघरच्या वाडा तालुक्यातील ओंगदे गावाजवळ गारगाई धरण उभारण्यात येणार आहे . तानसा अभयारण्य लगत असलेल्या धरणाची पाणी साठवणूक क्षमता सहा टीएमसी इतकी असून या धरणातून मुंबईकरांना दररोज 440 एम एल डी म्हणजेच आता मिळणाऱ्या पाण्याच्या अकरा टक्के अधिक पाणी मिळणार आहे .
मुंबईला पाणीपुरवठा करणार पालघर आणि ठाण्यातील सहावं तर बीएमसीचं स्वतःचं चौथ धरण असेल . हे धरण उभारण्यासाठी 1250 कोटी रुपये तर संपूर्ण प्रकल्पासाठी 3105 कोटी रुपये खर्च केला जाणार आहेत . मुंबईसह राज्यातील विविध भागात पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील जलसाठाही यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच 50 टक्क्यांच्या खाली आला आहे. सध्या धरणात 49.37 टक्के पाणी आहे. मात्र इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईची स्थिती चांगली असून या साठ्यातून आणखी 133 दिवस शहराला सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकतो.