पालघर प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा वारंवार गर्वाने उल्लेख होत असतानाच, त्याच भूमीत एका भयावह वास्तवाने समाजमनाला जबर धक्का दिला आहे. शाहू, फुले आणि आंबेडकरांनी घडवलेल्या प्रगत महाराष्ट्राच्या पायाशीच पुन्हा एकदा सरंजामशाहीची सावली दाटून आली आहे. आदिवासी भागात अल्पवयीन मुलींची पैशांत विक्री होत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवर ‘लग्न’ या नावाखाली सुरु असलेल्या या कोवळ्या मुलींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराने मानवी संवेदनांचा पूर्ण विसर पडल्याचे चित्र समोर येत आहे. १४-१५ वर्षांच्या मुलींना अवघ्या ४० ते ५० हजारांत विकत घेतल्याचे समोर आले आहे. यापैकी काही प्रकरणांत ७०-८० हजारांपर्यंत सौदा होत असल्याचेही माहितीचक्रात आहे.
लग्नासाठी मुली मिळत नाहीत… आणि सुरू झाला सौद्यांचा धंदा
वाढत्या हुंडाबळामुळे, शिक्षणाच्या अपेक्षांमुळे आणि नोकरीला महत्त्व मिळू लागल्याने काही तरुणांचे विवाह ठरत नाहीत. हीच मागणी-पुरवठ्याची दरी पाहून काही दलाल सक्रिय झाले. हे एजंट नवरदेवाकडून लाखो रुपये घेतात आणि आदिवासी भागातील निरक्षर, अत्यंत गरीब कुटुंबांना काही हजारांची आमिषे दाखवून मुलींचा सौदा करतात.
‘सुखात संसार होईल’, ‘मुलगा चांगल्या नोकरीत आहे’… अशा गोड बोलांनी फसवले गेलेले पालक आपल्या मुलींच्या भवितव्याचा चक्क व्यापार होत असल्याची कल्पनाही करू शकत नाहीत.
झोपडी ते नरकयात्रा : १५ वर्षांच्या पीडितेची हृदयद्रावक कहाणी
गवताच्या भिंती, गवताचेच छप्पर… इतक्या दारिद्र्यात वाढलेली ही मुलगी. आई-वडील वीटभट्ट्यांवर मजुरीला आणि तिला प्रामुख्याने आजीकडेच वाढवले गेले.
एका दिवशी गावातील कोर नावाच्या दलालाने आजीशी काहीतरी संगनमत केले. नंतर आजीचे निधन झाले आणि या गोंधळातच मुलीला थेट संगमनेरला नेण्यात आले. अवघ्या ५० हजारांत तिचा सौदा झाला होता.
‘थोड्या हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आहे’, असे सांगून एका क्षणात तिच्या हातात मंगळसूत्र टाकण्यात आले… आयुष्यभराचं ओझं!
ती मुलगी आज १५ वर्षांची असून, तिच्या हातात दोन वर्षांचे बाळ आहे. या तीन वर्षांत तिने भोगलेल्या अमानुष अत्याचारांची वेदना तिच्या चेहऱ्यावर शब्दांशिवाय उमटते.
दुसरी कहाणी : गर्भपात करून माहेरी हाकलले
जव्हारमधील १४ वर्षीय नीलम हिचाही याच पद्धतीने जळगावातील तरुणाशी ‘लग्न’ लावण्यात आले. लग्नानंतर ती गरोदर राहिली. पण तिच्या सासरच्यांनी जबरदस्ती गर्भपात करून तिला माहेरी परत पाठवले.
एजंटांचे पैसे मिळाल्यावर या मुलींचे नशिब धुळीस मिळत असल्याचे हे आणखी एक उदाहरण.
पालकांची असहायता आणि दलालांची दंडेलशाही
अत्यंत गरीब कुटुंबांना ४०-५० हजारांची रक्कम भविष्यातील संकटावरचा उपाय वाटतो. पण ते आपल्या चिमुकलींच्या आयुष्याचा ‘काळा करार’ ठरतो, याची त्यांना कल्पना नसते.
या मुली कोणाला दिल्या जात आहेत? कुठे राहतील? कोणत्या परिस्थितीत? काहीच माहित नसताना दिलेला ‘होकार’ आयुष्यभराची कैद बनतो.
पोलीस हालचाली – आरोपी आणि दलाल बेड्या
वाडा व जव्हार तालुक्यातील उघडकीस आलेल्या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी कारवाई केली आहे. संबंधित दलालांसह आरोपींना अटक करून चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.
परंतु, अशा अनेक मुलींच्या व्यथा अद्यापही दडल्या आहेत, हेही तितकेच सत्य.
पुरोगामी महाराष्ट्राच्या अंतःकरणाला प्रश्न
अशा घटना समोर येणे म्हणजे समाजातील असमानतेची खोल दरी उघड करण्यासारखे आहे.
गरीबी, निरक्षरता, फसवणूक आणि लिंगभेद यांचा काळा संगम आजही निर्धाराने उभा आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात कोवळ्या मुलींची विक्री, हा केवळ गुन्हा नाही… तर आपल्या सामूहिक संवेदनांना बसलेला जबर धक्का आहे.


