मुंबई प्रतिनिधी
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) प्रसिद्ध केला असून अपघाताच्या क्षणांबाबत महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. २२ पानी या अहवालानुसार, बारामती येथे २८ जानेवारी रोजी सकाळी लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नादरम्यान कोसळलेल्या लिअरजेट ४५ एक्सआर (VT-SSK) विमानाने जमिनीवर आदळण्यापूर्वी प्रथम झाडाला धडक दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
अपघातावेळी परिसरातील दृष्यमानता सुमारे २ हजार मीटर इतकी होती, असेही नमूद करण्यात आले आहे. दुर्घटनेनंतर लागलेल्या आगीमुळे विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) व कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) बाधित झाले असून त्यातील डेटा पुनर्प्राप्तीसाठी निर्माता अमेरिकन कंपनीची तांत्रिक मदत घेतली जात आहे. उपलब्ध यंत्रणांमधून काही रॉ डेटा डाउनलोड करण्यात आला असून त्याचे विश्लेषण सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे. सदर निष्कर्ष प्राथमिक स्वरूपाचे असून अपघाताचे अंतिम कारण निश्चित करण्यासाठी पुढील सखोल तपास आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या दुर्घटनेला महिनाभर पूर्ण होत असताना राज्याच्या राजकीय व प्रशासकीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडल्या. अपघातानंतर महाराष्ट्रात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला व २९ जानेवारी रोजी बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात जलद बदल घडले; सुनेत्रा पवार यांनी ३१ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि पुढे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. अर्थ व नियोजन खाते मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आले, तर पार्थ पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली.
अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी विविध स्तरांवर चौकशी सुरू असून DGCA कडून संबंधित चार्टर कंपनीचे विशेष सुरक्षा ऑडिट करण्यात आले आहे. राज्य सीआयडीकडून घातपात, गुन्हेगारी निष्काळजीपणा किंवा अन्य संभाव्य कारणांचा तपास सुरू आहे; तसेच पारदर्शकतेच्या दृष्टीने केंद्राकडे सीबीआय चौकशीची विनंतीही करण्यात आली आहे. अपघातातील ब्लॅक बॉक्स डेटा निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्याचे तांत्रिक विश्लेषण पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणाऱ्या या दुर्घटनेचे नेमके कारण काय, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


