
पालघर प्रतिनिधी
मुंबईहून इंदोरकडे जाणाऱ्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये एका महिला प्रवाशावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला ॲड. शितल शरद भोसले (वय ४५) या ठाण्याच्या रहिवासी असून आपल्या मुलाला इंदोरहून आणण्यासाठी त्या सामान्य डब्यातून प्रवास करत होत्या.
प्राथमिक माहितीनुसार, गाडी विरारच्या पुढे गेल्यानंतर डब्यातील काही अल्पसंख्याक प्रवाशांशी धार्मिक प्रतीकांवरून वाद निर्माण झाला. शितल भोसले यांच्या गळ्यातील रुद्राक्ष माळ व छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव पाहून एका महिला प्रवाशाने आक्षेप घेतला. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले आणि धारदार शस्त्राने भोसले यांच्यावर हल्ला करण्यात आला.
हल्ल्यात त्यांच्या हातावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, संबंधित अल्पसंख्यांक महिला प्रवाशांनी केवळ हल्ला नाही, तर त्यांना विवस्त्र करण्याचाही प्रयत्न केला. तसेच इतर काही पुरुषांनीही त्यांना घेराव घालून धमकावल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पालघर रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी चौघा आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. पालघर शहरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.