मुंबई प्रतिनिधी
आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झाले आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून नागरकुरनूलकडे जात असताना त्यांच्या कारचा ट्रकला धडक बसून हा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा पसरली आहे.
सुधाकर पठारे सध्या मुंबई पोलिस दलात पोर्ट झोनचे उपायुक्त (DCP) म्हणून कार्यरत होते. ट्रेनिंगसाठी ते हैदराबादला गेले होते. त्या ठिकाणी आपल्या नातेवाईकासह ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असताना त्यांचा अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती तेलंगणा पोलिसांनी मुंबई पोलिसांना कळवली आहे.
पोलिस अधीक्षक (SP) म्हणून त्यांनी चंद्रपूर, वसई आणि अमरावती सीआयडी येथे काम पाहिले. पोलिस उपायुक्त (DCP) म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई आणि ठाणे शहरात सेवा बजावली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मोक्का, तडीपारी, एमपीडीए यांसारख्या प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये विशेष धडाका लावला. कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच त्यांनी पोलिस दलात अनेक उपक्रम राबवले.
सुधाकर पठारे यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्र पोलिस दलाने एक कुशल, कर्तव्यनिष्ठ आणि धाडसी अधिकारी गमावला आहे.


