
नाशिक प्रतिनिधी
मस्सोजाग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिक शहरात दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केल्याचे खळबळ उडाली आहे. गंगापूर रोड परिसरातील सहदेवनगरच्या दत्त मंदिर परिसरात कृष्णा आंधळे उभा असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.
कृष्णा आंधळेने तोंडाला मास्क आणि कपाळाला टिळा लावला होता, असे वर्णन सुद्धा स्थानिकांनी केले आहे. नाशिक पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले असून, पोलीस घटनास्थळी येत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
कृष्णा आंधळे याला पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षीस जाहीर केले आहे, मात्र, त्याचा अद्यापपावेतो ठावठिकाणा लागलेला नाही. तो सहदेवनगरमधील आनंद हाईट्सजवळील दत्त मंदिर परिसरात दिसल्याचा दावा अॅड. गितेश तानाजी बनकर यांनी केला आहे.
अॅड. बनकर हे बुधवारी (दि.१२) सकाळी 9.15 वाजेच्या सुमारास दत्त मंदिराजवळ आले होते. त्यावेळी त्यांना एका झाडाजवळ दोघे दिसले. त्यातील एकाने मास्क खाली असता तो कृष्णा आंधळेच होता, ही बाब अॅड. बनकर यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात कॉल करून सांगितली. तितक्यात कृष्णा आंधळे व आणखी एकजण मखमलाबादच्या दिशेने गेला. १८ वर्षांपासून क्रिमिनल कोर्टात नाशिक आणि मुंबईला प्रॅक्टिस करत असल्याने गुन्हेगाराला कस ओळखायचे हे माहिती असल्याचे अॅड. बनकर यांनी म्हटले आहे.
नाशिकमध्ये फेब्रुवारी महिन्यातही एका मंदिरात कृष्णा आंधळे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, ती अफवा असल्याचे समोर आले होते. अॅड. बनकर यांनी आंधळे दिसल्याचा दावा केल्याने पोलिसांना कसून तपास सुरु केला आहे. गंगापूर पोलीस आणि नाशिक शहर गुन्हे शाखेचे पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध घेत आहेत.
कृष्णा आंधळे हा दोन वर्षांपासून फरार असून, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सुदर्शन घुलेसह एकाला पुण्यामधून अटक करण्यात आली होती. सर्व आरोपींवर आरोपपत्र पोलिसांनी दाखल केले आहे. मात्र कृष्णा आंधळे याला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांनी त्याच्यावर बक्षीस जाहीर केले आहे. आमदार संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड यांनी आंधळे याचा मर्डर झाला असावा, असा अंदाजही व्यक्त केला होता.