
चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून केलेल्या हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू झाला आहे. टोळक्याने धारधार शस्त्राने पोलिसांवर हल्ला केला, यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे.
जखमी पोलिसावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
चंद्रपूरमध्ये खाकीवर हल्ला करण्यात आला आहे. ७ मार्च रोजी चंद्रपूरमधील पठाणपुरा गेटजवळ असणाऱ्या पिंक पॅराडाईज बारमध्ये दोन पोलीस कर्मचारी बसले होते. त्यावेळी त्यांची काही तरूणांसोबत बाचाबाची झाली, या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या युवाकाने काही तरूणांच्या मदतीने पोलिसांवर चाकूने सपासप वार केला. या हल्ल्यामध्ये दिलीप चव्हाण यांचा मृत्यू झाला तर समीर चाफले गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बारमध्ये पोलीस आणि काही तरूणांमध्ये बाचाबाची झाली होती. पण नेमका हा वाद कशामुळे सुरू झाला? हे समोर आलेले नाही. पठाणपुरा गेट परिसरात नेहमीच गुन्हेगारीच्या घटना घडत असतात. पोलिसांवरच हल्ला झाल्यामुळे चंद्रपूरमध्ये कायद्याचे तीन तेरा वाजल्याची प्रतिक्रिया येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवून गुन्हेगार सर्सार गुन्हे करत आहेत. पण आता पोलिसांवरच हल्ला झाल्यामुळे चंद्रपूरमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहे.