
गुजरात वृत्तसंस्था
उद्या 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिवस आहे. या निमित्ताने गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील वानसी-बोरसीमध्ये लखपती दीदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात फक्त आणि फक्त महिलाच उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे 1.1 लाख महिला या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या लखपती दीदींना संबोधित करणार आहेत. बचत गटाच्या माध्यमातून या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हा लखपती दीदी योजनेचा उद्देश आहे. देशभरातील कमीत कमी दोन कोटी महिलांना लखपती बनवणं हा या योजनेचा उद्देश आहे.
हा कार्यक्रम पोलिसांच्या क्षेत्रातही नवीन मैलाचा दगड प्रस्थापित करणार आहे. कारण या एवढ्या मोठ्या महा कार्यक्रमाची तयारी पोलिसांना करावी लागणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं धनुष्य पोलिस दलाला पेलावं लागणार आहे. विशेष म्हणजे महिला पोलिसच या कार्यक्रमाची सुरक्षा पाहणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम देशातील आजवरचा आगळावेगळा कार्यक्रम ठरणार आहे.