
मुंबई प्रतिनिधी
राज्य सरकारने ७५ हजार रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सर्व विभागांनी घेतलेल्या परीक्षांमार्फत नियुक्ती पत्र देण्याचे काम होत असताना ही संख्या १ लाख ५० हजार पर्यंत पोहोचली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
प्रशासनातील पदभरती हा एक विक्रम असून कुठल्याही राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या झालेल्या नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
मृद आणि जलसंधारण अधिकारी गट-ब (अराजपत्रित) पदावर निवड झालेल्या राज्यभरातील ६०१ उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण गुरुवारी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात सहा उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्र देण्यात आले. जलसंधारण विभागामध्ये निवड झालेल्या या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारमधील पदभरतीबाबत माहिती दिली. राज्य सरकारमधील पदभरती प्रक्रिया पारदर्शी व्हाव्यात यासाठी सरकारने आयबीपीएस आणि टीसीएस या दोन नामंकित संस्थांची नेमणूक केली. तसेच नवीन नियमावली देखील लागू केली. यामुळे सुमारे ६० लाख उमेदवारांना पारदर्शी पद्धतीने परीक्षा देण्याची संधी उपलब्ध झाली, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
जलसंधारण विभाग हा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारा विभाग आहे. या विभागाच्या परिवारामध्ये नवनियुक्त अधिकाऱ्यांनी सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे ध्येय बाळगावे. सरकारच्या माध्यमातून सामान्यांची सेवा करण्याची आपणास संधी मिळाली आहे. या संधीचे सोनं करून जनसामान्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना केले. तर नवनियुक्त अधिकाऱ्यांमुळे जलसंधारण विभागातील कामांना अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त करत नव्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करावे, असे आवाहन जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी यावेळी केले.