देहू प्रतिनिधी
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ३७८ वा बीज सोहळा गुरुवारी तीर्थक्षेत्र देहू येथे लाखो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या वारकरी दिंड्या, वैष्णव आणि भाविकांच्या उपस्थितीत हरिनामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि अभंगवाणीने संपूर्ण देहूनगरी दुमदुमून गेली.
बीज सोहळ्यानिमित्त मागील दोन दिवसांपासून देहूत भाविकांचा ओघ सुरू होता. अनेक वारकरी दिंड्यांसह पायी देहूत दाखल झाले होते, तर मोठ्या संख्येने भाविक खासगी वाहनांनीही येथे पोहोचले. त्यामुळे संपूर्ण देहू नगरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. Indrayani River घाट परिसर, मंदिर परिसर, मोकळी मैदाने, शाळा, धर्मशाळा आणि शेतजमिनी येथे वारकरी मुक्कामी थांबले होते.
ठिकठिकाणी भजन, कीर्तन, हरिपाठ आणि सप्ताह सुरू असल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पहाटे तीन वाजता काकडा आरतीने धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. त्यानंतर श्रींची महापूजा पार पडली. श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर देहू तसेच तपोनिधी नारायण महाराज समाधी येथेही महापूजा करण्यात आली.
सकाळी सहा वाजता वैकुंठगमन स्थान (गोपाळपुरा) येथे संत तुकाराम महाराजांची महापूजा संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांच्यासह विश्वस्तांच्या उपस्थितीत पार पडली. या वेळी संस्थानचे आजी-माजी पदाधिकारी आणि संत तुकाराम महाराजांचे वंशजही उपस्थित होते.
सकाळी दहाच्या सुमारास मुख्य मंदिरातून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी वैकुंठगमन स्थानाकडे रवाना झाली. पोलिस बंदोबस्त आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पालखी मार्गावरील व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आली. पावणे अकराच्या सुमारास मुख्य मंदिराच्या महाद्वारातून पालखी प्रस्थान करताच भाविकांनी ‘ग्यानबा-तुकाराम’च्या गजरात तिचे उत्स्फूर्त स्वागत केले.
बीज सोहळ्यानिमित्त देहू नगरीत यात्रेचे वातावरण पाहायला मिळाले. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना तुळशी, बेलपान, फुले, धार्मिक पुस्तके, छायाचित्रे, कॅलेंडर तसेच विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली होती. आईस्क्रीम, पेठा, शेव-रेवडी, पेढे यांसह महिलांसाठी आभूषणांची दुकानेही मोठ्या प्रमाणात दिसून आली. त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी उसळल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले.


