
मुंबई प्रतिनिधी
बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाला होत असलेला तोटा, कर्मचाऱ्यांची देणी आणि मुंबई महापालिकेकडे सातत्याने करावी लागणारी आर्थिक मदतीची मागणी या पार्श्वभूमीवर तिकीट दर दुप्पट करण्याचा विचार केला जात आहे.
त्यानुसार साध्या बसचे भाडे पाचवरून 10 रुपये व वातानुकूलित बसचे तिकीट सहावरून 12 रुपये प्रस्तावित आहेत.
बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी गुरुवारी बेस्ट अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन भाडेवाढीसह बस ताफा आणि सेवांचा आढावा घेतला. ‘कर्मचाऱ्यांची देणी व तोटा यावर तोडगा काढण्यासाठी भाडेवाढीशिवाय पर्याय नाही. मात्र, याबाबत आणखी सविस्तर चर्चा करूनच निर्णय होईल. बेस्ट उपक्रम तोट्यात आहे. तपा कर्मचाऱ्यांची देणीही आहेत. यासह अन्य खर्चही आहेत. त्यामुळे भाडेवाढीचा पर्याय समोर आहे. मात्र याबाबत आताच सांगणे योग्य नाही , अशी प्रतिक्रिया एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.
काही दिवसांपूर्वीच मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या मीटरचे दर वाढवण्यात आले होते. 1 फेब्रुवारीपासून मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांनी वाढ झाली होती. तर कूल कॅबच्या दरात 8 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. या नवीन दरांनुसार, मुंबईत ऑटो रिक्षाचे किमान भाडे 23 रुपयांवरून 26 रुपये करण्यात आले आहे, तर टॅक्सीचे किमान भाडे ₹28 वरून ₹31 करण्यात आले आहे. तसेच, कूल कॅबच्या भाड्यात वाढ होऊन ₹40 ऐवजी ₹48 आकारले जाणार आहेत.