नवी दिल्ली वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना पुणे येथील सरहद संस्थेच्या वतीने दिला जाणाऱ्या प्रतिष्ठित महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
नवी दिल्लीतील न्यू महाराष्ट्र सदनात आज संध्याकाळी ६ वाजता हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यात ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदे यांचा गौरव करून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गौरव सोहळ्याला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, शिल्पकार पद्मभूषण राम सुतार, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारात ५ लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित याच कार्यक्रमात दिल्लीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव केला जाईल.
महाराष्ट्रातील अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या काळात चीफ मिनिस्टर ऐवजी कॉमन मॅन म्हणून काम करताना एकनाथ शिंदे यांनी राज्यातील गरिब, शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ, युवकांसाठी कल्याणकारी निर्णय घेतले. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली होती. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या या कार्यकर्तृत्वाचा सरदह संस्थेकडून महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.


