
सातारा प्रतिनिधी
लाडक्या बहिणीचे काम केल्याचा मोबदला नाही”
अंगणवाडी सेविकांकडून लाडक्या बहीण योजनेतील महिलांचे फॉर्म भरून घेण्यात आले. त्याचा मोबदला अद्याप सेविकांना मिळालेला नाही. असे असताना आता ई-पीक पाहणीचे काम लादले जाणार आहे.
महिला व बालविकास विभागाचा कसलाही संबंध नाही, तरीही हे काम अंगणवाडी सेविकांवर लादले जात आहे. याविरोधात जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका, सेविका संघाच्या वतीने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
दरम्यान, मुख्यमंत्री व लाडका भाऊ यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची परिस्थिती विचारात घेऊन योग्य न्याय करावा, अन्यथा तीन मार्चला आझाद मैदानावर आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका, सेविका संघाच्या वतीने ॲड. नदीम पठाण, राज्याध्यक्षा सुजाता रणनवरे यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविकांच्या मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येताना महिलांनी आपल्या मागण्यांचे फलक हातात घेतले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले, की अंगणवाडी सेविकांकडून लाडकी बहीण योजनेचे महिलांचे फॉर्म भरून घेण्यात आले. त्याबदल्यात ५० रुपये मोबदला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. याबाबत शासन निर्णय होऊन अंगणवाडी सेविकांना पैसे मिळालेले नाहीत. त्यातच आता ई-पीक पाहणीची नवीन जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर टाकली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांवर दडपण आणून त्यांच्यावर ईपी पाहणीचे काम लादू नये.
ही पाहणी करण्यासाठी विशेषज्ञांची नेमणूक केल्यास त्यांना रोजगार निर्मिती होणार आहे. शासनाकडून अंगणवाडी सेविकांचे अनेक देणी प्रलंबित असून, २०२५-२६ मध्ये अनेक अंगणवाडी सेविका सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या मागण्या मान्य झाल्यास त्यांना त्यांचा लाभ होणार आहे. पेन्शन मागणीच्या प्रस्तावावर तसेच मानधन नको वेतन द्या याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. एकूणच अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत शासनाने लवकरात लवकर कृती करावी, अन्यथा येत्या तीन मार्चला आझाद मैदानावर निदर्शने व आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.