पुणे प्रतिनिधी
पुणे-नाशिक महामार्गावर चाकणजवळ भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ओव्हरटेक केल्याचा राग मनात धरून दोन दुचाकीस्वारांनी पुण्याहून नाशिककडे जाणारी एसटी बस पाठलाग करून अडवली आणि चालकाला प्रवाशांसमोर बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, बसमधील प्रवाशांनी हात जोडून मारहाण थांबवण्याची विनंती केली, तरीही हल्लेखोरांनी त्यांना जुमानले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे.
चाकणचे गुंठामंत्री मुजोर झालेत. यांच्या या मुजोरीमुळे चाकणमध्ये सरकारी काम करायला सुद्धा कुणी तयार होत नाही.@Dev_Fadnavis जी या असल्या गुंडावर मोक्का लावा.. त्याशिवाय यांचा माज जाणार नाही. https://t.co/a3tv1qjJEt
— Saffron Monk (@mangeshspa) November 10, 2026
ओव्हरटेक केल्याचा राग, बसचा पाठलाग
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ९ नोव्हेंबर) दुपारी पुण्याहून नाशिकच्या दिशेने एसटी बस जात होती. यावेळी दोन वेगवेगळ्या दुचाकींवरून प्रवास करणाऱ्या तरुणांनी एसटी बसने ओव्हरटेक केल्याचा राग धरला. त्यानंतर त्यांनी बसचा पाठलाग करत पुणे-नाशिक महामार्गावर चाकण परिसरात बस अडवली. बस थांबताच दोघांनी चालकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले.
चालकाला मारहाण, प्रवाशांनाही धमकावले
दोन्ही तरुणांनी बसमध्ये प्रवेश करून चालकाला मारहाण केली. इतकेच नव्हे, तर बसमधील प्रवाशांनाही धमकावल्याची माहिती समोर आली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. चालकाला मारहाण होत असल्याचे पाहून प्रवाशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. काही प्रवाशांनी हात जोडून, ‘आम्हाला जाऊ द्या, मारहाण थांबवा,’ अशी विनवणी केली. मात्र, हल्लेखोरांनी प्रवाशांच्या विनंत्यांकडे दुर्लक्ष केले.
प्रवाशांना पर्यायी वाहनाने करावा लागला प्रवास
या प्रकारामुळे एसटी बसमधील प्रवाशांचा प्रवास खोळंबला. अखेर प्रवाशांनी पर्यायी वाहनांची व्यवस्था करून पुढील प्रवास केला. मारहाणीनंतर चालकानेही बसचा प्रवास पुन्हा सुरू केला. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
व्हिडिओ व्हायरल; संशयित पोलिसांच्या ताब्यात
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित संशयितांची ओळख पटवून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेच्या वेळी गुन्हा दाखल झालेला नसून, लवकरच गुन्हा नोंदवून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एसटी चालकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?
किरकोळ ओव्हरटेकच्या वादातून सार्वजनिक वाहतुकीची बस अडवणे, चालकाला मारहाण करणे आणि निष्पाप प्रवाशांना धमकावणे हा केवळ रस्त्यावरील वाद नसून सार्वजनिक सुरक्षेला दिलेले खुले आव्हान आहे. एसटी बसमध्ये एकाच वेळी अनेक प्रवासी प्रवास करतात. अशा वेळी चालकावर हल्ला होणे म्हणजे प्रवाशांच्याही जीविताला धोका निर्माण होणे होय. त्यामुळे अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आता पोलिसांच्या तपासात या घटनेमागील नेमके कारण आणि आरोपींची भूमिका स्पष्ट होणार आहे. मात्र, ओव्हरटेकच्या किरकोळ कारणावरून महामार्गावर कायदा हातात घेण्याचे धाडस करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवणार कोण, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.


