
सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका छोट्या एका गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी उमदी पोलिसांनी संशयित आरोपी पांडुरंग सोमनिंग कळ्ळी (वय ४५) याला ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समजल्यानंतर जतसह जिल्हाभरात संताप व्यक्त झाला. पोलिसअधीक्षक संदीप घुगे, उपाधीक्षक सुनील साळुंखे यांनी गावात धाव घेत तपासाबाबत सूचना दिल्या. याप्रकरणी आज (ता. ७) तालुका बंदची हाक देण्यात आली असून; काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष, व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा देत दुपारी जत शहरात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत पोलिस आणि ग्रामस्थांनी दिलेली माहिती अशी, आज सकाळी बालिकेला शाळेत सोडण्यासाठी आजीने शोधाशोध सुरू केल्यानंतर गल्लीत ती बेपत्ता झाल्याचे स्पष्ट झाले. शेवटी गावात दवंडी देण्यात आली. पोलिस पाटील व ग्रामस्थांनी उमदी पोलिस ठाण्याला कळवले. पोलिसांनीही गावात येऊन शोध सुरू केला. सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनीही गावात भेट दिली. ग्रामस्थ शोधाशोध करीत असताना गावातील एका पत्र्याच्या शेड समोर बदामाच्या झाडाखाली संशयित आरोपी पांडुरंग दारूच्या नशेत झोपलेला दिसून आला.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यानेच हा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले. आरोपी गावातीलच असल्याने सकाळी नऊच्या सुमारास त्याने खेळणाऱ्या बालिकेला फूस दाखवत गावाजवळच्या एका शेडमध्ये नेऊन अत्याचार केले. त्यानंतर तिथेच तिचा निर्घृणपणो खून केला. या प्रकाराची कबुली त्याने पोलिसांनी खाक्या दाखवताच दिली.
दरम्यान, पीडित बालिकेचे आई-वडील रत्नागिरी येथे मजुरीसाठी असतात. सध्या ती तिच्या आजीकडे गावात राहत होती. सध्या मुलीची आई प्रसूतीसाठी कर्नाटकातील मुधोळ गावी गेली आहे. बालिकेवरील अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गावात शोकछाया पसरली. सायंकाळी बालिकेचा मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.