
सांगली प्रतिनिधी
पलूस : चालकाचा मोटारीवरील ताबा सुटल्याने मोटारीने तीन पलट्या घेऊन झालेल्या स्वयंअपघातात धैर्यशील संभाजी पाटील (वय 37, रा. नागराळे, ता. पलूस) यांचा जागीच मृत्यू झाला. कराड-तासगाव महामार्गावर तुरची कारखान्याजवळ सोमवारी (दि. 17) सकाळी हा भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, धैर्यशील हे पलूस येथील उद्योजक भगवान महादेव डाळे यांच्या गाडीवर (एमएच १० बीएम ११) तीन वर्षांपासून चालक होते. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते सर्व्हिसिंगसाठी मोटार घेऊन पलूस मधून सांगलीला निघाले होते. तुरची कारखान्याजवळ धैर्यशील यांचा मोटारीवरील ताबा सुटला आणि मोटारीने महामार्गावर तीन पलट्या घेतल्या.
अपघात एवढा भीषण होता की, मोटारीमधील सर्व एअर बॅग्ज बाहेर पडल्या व मोटारीचा वरील भाग उडून जाऊन गाडीचा चेंदामेंदा झाला. मोटारीचे लहान-मोठे तुकडे रस्त्यावर विखुरले होते. यामध्ये चालक धैर्यशील यांच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. दरम्यान स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. प्राथमिक अंदाजानुसार, वाहनाचा वेग अधिक असल्याने हा अपघात घडल्याचे लोकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.