सांगली प्रतिनिधी
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने मोठी खेळी करत विरोधकांना धक्का दिला आहे. शुक्रवारी सांगलीत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात दोन माजी महापौरांसह १६ माजी नगरसेवकांनी अजित पवार गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये एक माजी महापौर काँग्रेसचा तर दुसरा माजी महापौर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आहे. उर्वरित १६ माजी नगरसेवक हे दोन्ही पक्षांतील आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार इंद्रिस नायकवडी यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी सांगली–सातारा जिल्ह्यांच्या राजकीय आणि सामाजिक परंपरेचा उल्लेख केला. “मी गेली ३५ वर्षे राजकारणात कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने या भागाने राज्याला आणि देशाला मोठे नेते दिले. मात्र काळानुसार नव्या नेतृत्वाला संधी देणे आवश्यक असते,” असे ते म्हणाले.
१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. “सांगली महापालिकेला आजही स्वतःच्या उत्पन्नावर स्वयंपूर्ण होता आलेले नाही. केंद्र व राज्याकडून अधिक निधी आणणे गरजेचे आहे. शहराच्या विकासासाठी ‘मेट्रो सिटी’ संकल्पना आवश्यक असून उद्योगांना चालना देण्यासाठी विमानतळासारख्या पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
नवीन कार्यकर्त्यांच्या प्रवेशाबाबत आश्वासन देताना त्यांनी सांगितले की, “पक्षात नव्याने आलेल्यांना पश्चात्ताप होणार नाही आणि जुन्या कार्यकर्त्यांवरही अन्याय होणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे.”
महापालिका निवडणुकीआधी झालेल्या या मोठ्या पक्षप्रवेशामुळे सांगलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


