आंध्रप्रदेश:
आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यात विजयवाडा वेस्ट बायपासवर इलेक्ट्रिक कारला लागलेल्या भीषण आगीत तीन वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडकली. त्यानंतर काही क्षणांतच कारने पेट घेतला. आगीने रौद्र रूप धारण केल्याने कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या दुर्घटनेत आणखी एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब गुंटूर जिल्ह्यातील नंबुरू गावात आयोजित एका कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहून घरी परतत होते. सोमवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची इलेक्ट्रिक कार विजयवाडा वेस्ट बायपासवरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार थेट रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकली. धडकेनंतर कारला अचानक आग लागली आणि काही वेळातच आगीने संपूर्ण वाहनाला वेढले.
आगीचा भडका; चौघांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही
कारला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिस आणि अग्निशामक दलाला घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र, आग वेगाने पसरल्यामुळे कारमध्ये अडकलेल्या चार जणांचा जीव वाचविण्यात यश आले नाही. या दुर्घटनेत कोम्मारेड्डी रामदेव, कोम्मारेड्डी अरुणा, तिगुरु विजया आणि अवघ्या तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला.
अपघातातील पाचवा प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत असून त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याची माहिती आहे.
घटनास्थळी जळालेल्या कारचा सांगाडा; पोलिसांकडून तपास
या दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. कार पूर्णपणे जळून खाक झाल्याने तिचा केवळ सांगाडा उरला होता. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविले असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात कार अतिवेगात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अपघात नेमका कशामुळे झाला आणि धडकेनंतर कारने इतक्या वेगाने पेट का घेतला, याचा तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
कौटुंबिक कार्यक्रमातून आनंदाने घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तीन वर्षांच्या चिमुकल्यासह चार जणांचा मृत्यू झाल्याने या दुर्घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.


