उत्तर प्रदेश:
उत्तर प्रदेशातील बहराइच येथे भाजपच्या ‘महिला जनआक्रोश मोर्चा’दरम्यान शनिवारी दुपारी घडलेल्या अपघाताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. आंदोलनादरम्यान विरोधकांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत असताना झालेल्या अचानक स्फोटात भाजपच्या महिला आमदार अनुपमा जयस्वाल या किरकोळ भाजल्या गेल्या. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
जिल्हाधिकारी (डीएम) चौकात सुरू असलेल्या या आंदोलनात समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येत होते. यावेळी आमदार जयस्वाल यांनी पुतळ्याला आग लावण्यासाठी काडी पेटवली असता, पुतळ्याच्या आत साठवलेल्या ज्वलनशील पदार्थामुळे अचानक स्फोट झाला.
या स्फोटानंतर आगीचा भडका थेट त्यांच्या चेहऱ्यावर आला. कपाळ आणि केसांना आग लागल्याने काही क्षण गोंधळ उडाला. मात्र, उपस्थित कार्यकर्त्यांनी तत्काळ धाव घेत आग विझवली आणि त्यांना सुरक्षितस्थळी हलवले. त्यानंतर पोलिसांच्या वाहनातून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेनंतर भाजपचे स्थानिक पदाधिकारी राहुल राय यांनी सांगितले की, पुतळ्यात पेट्रोलचे प्रमाण अधिक असल्याने स्फोट झाला असावा. दरम्यान, महाराजा सुहेलदेव वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदारांना सुमारे ४.५ टक्के ‘सुपरफिशियल बर्न’ झाले असून डोळ्यांना कोणतीही इजा झालेली नाही.
या प्रकारानंतर आंदोलनाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या आंदोलनांत आवश्यक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणीही विविध स्तरांतून होत आहे.


