सातारा प्रतिनिधी
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६-३१ या कालावधीतील संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विविध मतदारसंघांतून सहा उमेदवारांनी सात नामनिर्देशनपत्रे दाखल केली. यामध्ये खासदार श्री. छत्रपती उदयनराजे भोसले तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचा समावेश आहे.
शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आपले अर्ज दाखल केले. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला पहिल्याच दिवशी सुरुवात झाली आहे.
दरम्यान, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्याने या दोन दिवसांत नामनिर्देशनपत्रांची विक्री आणि अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया बंद राहणार आहे. त्यानंतर २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत.
निवडणूक कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करताना केवळ उमेदवार किंवा सूचक यांनीच उपस्थित राहावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. समर्थक आणि इतर व्यक्तींनी कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था संजयकुमार सुद्रिक यांनी केले आहे.


