चालक किरकोळ जखमी, एक प्रवासी गंभीर
सातारा प्रतिनिधी
सातारा : कास पठारावरील फुलांचा बहर पाहण्यासाठी सोलापूरहून साताऱ्यात आलेल्या पर्यटकांच्या बसचा परतीच्या प्रवासात यवतेश्वर घाटात ब्रेक फेल झाल्याची धक्कादायक घटना घडली. घाटातील तीव्र उतारावर बसचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून बस डोंगराच्या बाजूला वळवली. त्यामुळे बस दरीत कोसळण्याचा किंवा मोठा अपघात होण्याचा धोका टळला आणि बसमधील तब्बल 32 प्रवाशांचे प्राण बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून पर्यटकांचा एक गट कास पठारावर फिरण्यासाठी आला होता. कास पठाराची सफर केल्यानंतर हे पर्यटक बसने परत साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. यवतेश्वर घाटात बस उतारावरून खाली येत असताना अचानक ब्रेकने काम करणे बंद केले. त्यामुळे काही क्षणांतच बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने नियंत्रण न गमावता बस डोंगराच्या बाजूला घेतली. बसला धडक देत वेग कमी करण्याचा प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा घाटातील उतार आणि वळणांमुळे बस अनियंत्रित होऊन गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
या घटनेत बसचालक किरकोळ जखमी झाला असून एका प्रवाशाला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बसमध्ये एकूण 32 प्रवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले असून अपघातग्रस्त बस बाजूला करण्याचे तसेच वाहतूक सुरळीत करण्याचे काम करण्यात आले.
कास पठार हे सातारा शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असून पर्यटन हंगामात येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन या परिसरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी सातारा जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून वेळोवेळी वाहतूक नियोजन करण्यात येते.
दरम्यान, घाटरस्त्यावर वाहनांचे ब्रेक, टायर आणि इतर यांत्रिक बाबींची तपासणी करूनच वाहने चालविण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. विशेषतः पर्यटकांच्या वाहनांनी घाटमार्गावरून प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले.


