सातारा प्रतिनिधी
सातारा : मुंबईतील ‘द सुपर कार रूट ग्रुप’च्या तब्बल २५ सुपरकार्सचा ताफा साताऱ्यात दाखल झाल्याने शहरातील कारप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत या विशेष सुपरकार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी नागरिकांनी सुपरकार्स पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

सातारा आणि कास परिसरातील पर्यटनाला व्यापक प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या या उपक्रमाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वागत केले. सातारा जिल्ह्याला निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि विविध पर्यटनस्थळांची समृद्ध पार्श्वभूमी लाभली आहे. ही ओळख देशभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची मदत होऊ शकते. पर्यटनवाढीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईहून आलेल्या या ताफ्यात विविध नामांकित कंपन्यांच्या आकर्षक आणि अत्याधुनिक सुपरकार्सचा समावेश होता. वाहनांची रचना, आधुनिक तंत्रज्ञान, इंजिनची क्षमता आणि वाहनमालकांचे अनुभव जाणून घेण्यासाठी उपस्थितांना संधी मिळाली. त्यामुळे कारप्रेमींसह नागरिकांनीही या सुपरकार्स पाहण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘द सुपर कार रूट ग्रुप’चा हा उपक्रम केवळ कारप्रेमापुरता मर्यादित नसून विविध पर्यटनस्थळांना भेट देत त्यांची ओळख व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. सातारा, कास आणि परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक वारसा तसेच पर्यटनक्षमता देशाच्या विविध भागांतील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचा उपयोग होऊ शकतो. साताऱ्यातून सुरू झालेल्या या रॅलीमुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला वेगळी प्रसिद्धी मिळण्यास हातभार लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


