पुणे प्रतिनिधी
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडत असताना पुणे पोलिस दलातील पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे यांचे अचानक निधन झाल्याची दु:खद घटना घडली. गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारत असताना तेलंगे यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या काळात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी विविध गणेश मंडळांच्या ठिकाणी तसेच विसर्जन मार्गांवर कर्तव्य बजावत आहेत. याच बंदोबस्तादरम्यान पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे हे गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. बोलत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळल्याचे समोर आले.
घटनेनंतर परिसरात उपस्थित असलेल्या नागरिक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली. तेलंगे यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे पोलीस दलात तसेच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य बजावत असतात. अशाच कर्तव्यावर असताना दत्तात्रय तेलंगे यांच्यावर काळाने घाला घातला.
पुणे शहरात आज अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी प्रमुख विसर्जन मार्गांवर सुरक्षा व्यवस्था वाढवली असून वरिष्ठ अधिकारीही बंदोबस्ताचा आढावा घेत आहेत. तेलंगे यांच्या निधनामुळे या बंदोबस्तात कार्यरत असलेल्या पोलिसांमध्येही शोककळा पसरली आहे.


