पुणे प्रतिनिधी
पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली आहे. महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर पुणे शहराचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. पुण्याची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागांसह इतर राज्ये आणि परदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्त्यावरून मुख्य मिरवणूक मार्गक्रमण करते. बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्याच्या माध्यमातून गणेश मंडळे या मुख्य मार्गांवर दाखल होतात.
मिरवणुकीदरम्यान कोणतीही आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी मुख्य विसर्जन मार्गासह अन्य महत्त्वाच्या ठिकाणी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा आणि गर्दीमध्ये नागरिकांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासल्यास तातडीने सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे नगरसेवक राघवेंद्र उर्फ बाप्पु मानकर यांनी सांगितले. राघवेंद्र बाप्पु मानकर मेडिकल फाऊंडेशनच्या माध्यमातून नुमवि प्रशाला (बाजीराव रस्ता), एस.पी. कॉलेज चौक (टिळक रस्ता), ओंकारेश्वर मंदिर (शनिवार पेठ), शर्मिली चौक (कुमठेकर रस्ता) आणि आझाद मित्र मंडळ (लक्ष्मी रस्ता) येथे रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आहेत.
नुमवि प्रशाला, बाजीराव रोड – 7888008856 (आशुतोष); एस.पी. कॉलेज गेट, टिळक रोड – 7666073800 (अनिल); ओंकारेश्वर मंदिर चौक, शनिवार पेठ -8806774937 (रेहान); शर्मिली चौक, कुमठेकर रोड, विश्रामबागवाडीजवळ – 9158301816 (गणेश); आझाद मित्र मंडळ, कुलकर्णी पेट्रोल पंपाशेजारी, लक्ष्मी रोड – 7666658552 (अरबाज).
दरम्यान, पुणे महापालिकेची आरोग्य यंत्रणाही विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झाली आहे. मिरवणूक संपेपर्यंत डेक्कन जिमखाना, नटराज टॉकीजजवळील परिसर, लक्ष्मी रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालयाजवळ आणि टिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे महापालिकेच्या रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक रुग्णवाहिकेसोबत एक वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माता, एक परिचारिका आणि विविध कामांसाठी एक सेवक असा कर्मचारीवर्ग तैनात करण्यात आला आहे. तातडीच्या उपचारांसाठी आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्यही या रुग्णवाहिकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.


