पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात ७० वर्षीय अंबादास संतराम खांडेकर यांच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. या प्रकरणात ६८ वर्षीय मंगल श्रीमंत होनमाने यांना अटक करण्यात आली आहे. हत्येनंतर मृतदेह अर्धवट जाळून विहिरीत टाकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. डीएनए चाचणी आणि कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिस तपासातून या प्रकरणाचा छडा लागला.
अंबादास खांडेकर (वय ७०, रा. शंकरगाव, ता. पंढरपूर) हे २७ जुलै रोजी मुलीची भेट घेऊन निघाल्यानंतर बेपत्ता झाले होते. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, २ ऑगस्ट रोजी शंकरगाव परिसरातील एका शेतातील विहिरीत गावकऱ्यांना मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या तसेच अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण होते. पोलिसांनी मृतदेहाचे नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवले.
अंबादास यांच्या दोन्ही मुलींचे डीएनए नमुने घेऊन फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. अहवालानंतर विहिरीत सापडलेला मृतदेह अंबादास खांडेकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी अंबादास यांच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स तपासले. त्यातून अंबादास आणि मंगल होनमाने यांच्यात सातत्याने संपर्क असल्याचे समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांमध्ये गेल्या १० वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि त्यांच्यात नियमित फोनवर संभाषण होत होते.
सुनेबद्दल अपशब्द वापरल्याच्या आरोपातून वाद
पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्या माहितीनुसार, २७ जुलै रोजी अंबादास हे मंगल यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी मंगल यांच्या सुनेबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. तसेच अंबादास यांच्या दारूच्या व्यसनावरून आणि कौटुंबिक कारणांवरूनही त्यांच्यात वाद झाल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या वादातून मंगल यांनी कोयत्याने वार करून अंबादास यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर मृतदेहावर रॉकेल ओतून तो जाळण्याचा आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. अर्धवट जळालेला मृतदेह विहिरीत टाकण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पंढरपूरच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करत मंगल होनमाने यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

