स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : गणपती विसर्जनासाठी खारदांडा जेट्टी परिसरात गेलेल्या महिलेची रिक्षात ठेवलेली बॅग चोरीला गेल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणाचा तपास करत खार पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक करून चोरीस गेलेला ३ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.
मानसी महेंद्र चिले (४३, रा. विरार पूर्व, पालघर) या नातेवाईकांसह गणपती विसर्जनासाठी खारदांडा जेट्टी येथे गेल्या होत्या. विसर्जनासाठी जाताना त्यांनी आपली बॅग रिक्षामध्ये ठेवली होती. विसर्जन आटोपल्यानंतर रिक्षाजवळ परतल्यानंतर बॅग आढळून आली नाही. परिसरात तसेच रिक्षाचालकाकडे चौकशी करूनही बॅगेचा शोध लागला नाही.
बॅगेमध्ये ३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २ हजार ५०० रुपये रोख आणि सुमारे ४ हजार रुपये किमतीचे कपडे असा एकूण ३ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान शैलेंद्रकुमार दीनानाथ कश्यप (३३, रा. खारदांडा, खार पश्चिम, मुंबई) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहायक पोलीस निरीक्षक कुंभारे, पोलीस उपनिरीक्षक चौधरी आणि त्यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.

