मुंबई प्रतिनिधी
मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. येत्या २०२८ पर्यंत मुंबईतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना सेवा निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कुलाबा येथे मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजना टप्पा-२ अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थानांच्या चाव्यांचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची निवासाची समस्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. मुंबईच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणारे कर्मचारी मात्र स्वतः अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहत असल्याची वस्तुस्थिती आहे. अनेक कर्मचारी दीडशे चौरस फुटांच्या जुन्या, मोडकळीस आलेल्या घरांमध्ये, सामूहिक स्वच्छतागृहांच्या सुविधेवर अवलंबून राहून जीवन जगत होते. या पार्श्वभूमीवर पालिकेने उभारलेल्या नव्या निवासस्थानांमुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आश्रय योजनेअंतर्गत आज घरांच्या चाव्या वितरित होत आहेत, हा अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना यापूर्वी अत्यंत अपुऱ्या सुविधांमध्ये राहावे लागत होते. आता त्यांना ३०० चौरस फुटांचे सुसज्ज घर मिळत आहे. ही समाधानाची बाब आहे.
या इमारतींच्या बांधकामासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, पालिकेने अशा प्रकारची इमारत प्रथमच उभारली आहे. या इमारतींचे नियोजित आयुष्य १०० वर्षांचे असून, पुढील दहा वर्षांचा देखभाल खर्चही संबंधित विकासकाकडून केला जाणार आहे. त्यामुळे घरांचा ताबा मिळाल्यानंतर रहिवाशांना देखभालीच्या खर्चाची चिंता करावी लागणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
निवृत्तीनंतरही कुटुंबाला घराचा आधार
सफाई कर्मचारी स्वतः अस्वच्छ वातावरणात काम करून संपूर्ण मुंबईचे आरोग्य जपतात. मात्र, त्यांनाच अत्यंत प्रतिकूल आणि अपुऱ्या सुविधांच्या घरांमध्ये राहावे लागत होते. आशियातील सर्वांत मोठ्या महानगरपालिकेचे कर्मचारी अशा परिस्थितीत राहणे ही समाधानकारक बाब नव्हती. नव्या निवासस्थानांमुळे त्यांच्या राहणीमानात बदल होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विशेष म्हणजे, संबंधित सफाई कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी मुलगा सेवेत रुजू झाल्यास निवासस्थान त्याच्या नावावर हस्तांतरित करण्याची तरतूद असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला दीर्घकाळ निवासाचा आधार मिळू शकणार आहे.
२०२८ ची मुदत महत्त्वाची
मुंबईतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना २०२८ पर्यंत सेवा निवासस्थाने उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या निवासस्थानाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र, ही घोषणा प्रत्यक्षात किती वेगाने पूर्ण होते, किती कर्मचाऱ्यांना घरे मिळतात आणि प्रलंबित निवासाचा प्रश्न कसा मार्गी लागतो, याकडे आता सफाई कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.


