पटियाला :
पंजाबमधील पटियाला जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी धावत्या कर्मभूमी एक्स्प्रेसला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. पंजाबमधून बिहारच्या दिशेने जाणाऱ्या या रेल्वेच्या पॅन्ट्री कारमधून आगीची सुरुवात झाली आणि काही वेळातच आगीने इतर डब्यांनाही आपल्या विळख्यात घेतले. आगीचे लोळ आणि धुराचे प्रचंड लोट पाहून प्रवाशांमध्ये घबराट पसरली. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी सामान तिथेच सोडून रेल्वेतून खाली उड्या मारल्या. या घटनेचे थरकाप उडवणारे व्हिडीओ समोर आले आहेत.
#WATCH | Rajpura, Punjab: Fire breaks out in 4 coaches of Karmabhumi Express in the Ambala division; no casualties reported
Northern Railway CPRO Himanshu Shekhar Upadhyay stated that the train stopped safely after its safety system was triggered near Sarai Banjara station. The… pic.twitter.com/ezN6sgNsye
— ANI (@ANI) November 6, 2026
पटियाला जिल्ह्यातील राजपुरा परिसरात सराय वंजारा गावाजवळ ही घटना घडली. रेल्वेगाडी प्रवासात असताना अचानक आगीची घटना घडल्याने प्रवाशांना सुरुवातीला नेमके काय झाले, याचा अंदाजच आला नाही. मात्र, आगीचा धूर आणि ज्वाळा दिसू लागताच प्रवाशांमध्ये एकच धावपळ सुरू झाली. अनेक प्रवाशांनी जीवाच्या आकांताने रेल्वेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. काही प्रवासी आपले सामान सोडून सुरक्षित ठिकाणी धावले. घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रेल्वेच्या डब्यांमधून धुराचे मोठमोठे लोट बाहेर पडताना आणि प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत रेल्वेबाहेर उभे असल्याचे दिसत आहे.
पॅन्ट्री कारमधून आगीची सुरुवात
पटियालाचे जिल्हाधिकारी हिमांशू अग्रवाल यांनी ‘आज तक’शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या पॅन्ट्री कारमध्ये सर्वप्रथम आग लागली. त्यानंतर ही आग इतर काही डब्यांपर्यंत पसरली. रेल्वेतील फायर अलार्म वाजल्यानंतर प्रवासी सतर्क झाले आणि त्यांनी तातडीने रेल्वेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांनी प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट होत आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याने रेल्वे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
रेल्वेकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
या आगीच्या घटनेची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पॅन्ट्री कारमध्ये आग नेमकी कशामुळे लागली, अग्निसुरक्षा यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत होती का आणि आग इतर डब्यांपर्यंत कशी पसरली, याची तपासणी केली जाणार आहे. आगीमुळे रेल्वेचे किती नुकसान झाले, याची माहितीही अद्याप समोर आलेली नाही.
सध्या सणासुदीचा काळ असल्याने रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी आहे. अशा परिस्थितीत धावत्या रेल्वेला आग लागण्याची घटना घडल्याने रेल्वेतील अग्निसुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन यंत्रणा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी काही क्षणांत मृत्यूच्या दारात पोहोचल्याचा थरार प्रवाशांनी अनुभवला.


