मुंबई प्रतिनिधी
मुंबई : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेसह स्वच्छतेची तपासणी वाढवली आहे. या मोहिमेअंतर्गत मोहम्मद अली रोडवरील प्रसिद्ध ‘सुलेमान उस्मान मिठाईवाला’ या दुकानाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गंभीर स्वच्छता त्रुटी आढळल्याने दुकानाचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे.
एफडीएकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत ही तपासणी करण्यात आली. दुकानातील अन्न तयार करण्याच्या आणि साठवण्याच्या ठिकाणाजवळ उघडे ड्रेनेज, सांडपाणी तसेच कचरा साठवण्याची व्यवस्था आढळली. त्यामुळे अन्नपदार्थांच्या ठिकाणी झुरळे आणि इतर कीटकांचा संपर्क होण्याचा धोका असल्याचे तपासणीत निदर्शनास आले.
तसेच दुकानात तयार मिठाई उघड्या आणि अस्वच्छ वातावरणात ठेवण्यात आल्याचे एफडीएच्या तपासणीत आढळले. मिठाईच्या सुरक्षित साठवणुकीसाठी आवश्यक तापमान आणि आर्द्रता नियंत्रणाची योग्य व्यवस्था नसल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले.
या बाबींची गंभीरता लक्षात घेऊन एफडीएने दुकानाचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला आहे. स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होईपर्यंत ही कारवाई कायम राहणार असल्याचे उपलब्ध माहितीतून स्पष्ट होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मोहम्मद अली रोड परिसरातील दोन प्रसिद्ध रेस्टॉरंट्सवरही एफडीएकडून परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर एफडीएच्या नियमांचे पालन केल्यानंतर संबंधित रेस्टॉरंट्सवरील कारवाई मागे घेण्यात आली.
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एफडीएची सूत्रे हाती घेतल्यानंतर विभागाच्या तपासणी आणि कारवाईला वेग आल्याचे चित्र आहे. स्वच्छता, खाद्यपदार्थांची साठवणूक आणि एफडीएच्या नियमांचे पालन याबाबत विभागाकडून तपासण्या केल्या जात आहेत.

