मुंबई प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील खंडवा येथील इमरान शेख असे मृत तरुणाचे नाव आहे. रोजगाराच्या शोधात तो दोन दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. या घटनेचा तपास आता महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला आहे.
आरपीएफ पोस्टवर आला आणि अस्वस्थ असल्याचे सांगितले
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे १०.१८ वाजता इमरान सीएसएमटीच्या मुख्य आरपीएफ पोस्टवर खंडव्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची माहिती घेण्यासाठी आला होता. त्यावेळी तो अस्वस्थ अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. काही जण आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा तो करत होता, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
यानंतर त्याचे वर्तन आक्रमक झाल्याचे आरपीएफकडून सांगण्यात आले. त्याने आरपीएफचे एसआय अनिकेत यांच्यावर हल्ला केला तसेच स्वतःलाही इजा करण्याचा प्रयत्न केला, असा दावा आरपीएफने केला आहे. त्यामुळे स्वतःला किंवा इतरांना इजा होऊ नये म्हणून त्याला आवरण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.
शौचालयात गेल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत आढळला
दुपारी सुमारे १२.३० वाजता इमरानला शौचालयात जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, सात ते आठ मिनिटांनंतरही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शौचालयाचा दरवाजा उघडण्यात आला असता इमरान बेशुद्ध अवस्थेत आढळला.
त्यानंतर त्याला तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दुपारी सुमारे १२.५४ वाजता रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी सीएसएमटी जीआरपीकडून अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नातेवाईकांकडून मारहाणीचा आरोप
इमरानच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी जीआरपीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. इमरानला मारहाण करण्यात आल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. मात्र, या आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.
खिशात सापडली दोन रेल्वे तिकिटे
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, इमरानकडे कोणतेही ओळखपत्र किंवा मोबाईल फोन आढळला नाही. मात्र, त्याच्याकडे रेल्वेची दोन जनरल तिकिटे सापडली. त्यापैकी एक तिकीट खंडवा-भुसावळ मार्गाचे असून ते १८ सप्टेंबर २०२६ रोजीचे आहे. दुसरे तिकीट नाशिक-दादर मार्गाचे असून ते १९ सप्टेंबर २०२६ रोजीचे आहे.
इमरानचा फोटो ओळख पटवण्यासाठी भुसावळ विभाग आणि स्थानिक पोलिसांकडे पाठवण्यात आला आहे. तो मुंबईत नेमका कोणत्या कारणासाठी आला होता आणि त्याच्या मुंबईतील हालचाली काय होत्या, याचाही तपास सुरू आहे.
सीआयडीकडून तपास सुरू
आरपीएफच्या ताब्यात असताना इमरानचा मृत्यू झाल्याने प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांच्या सीआयडीकडे देण्यात आली आहे. सीआयडी कोकण रेंजचे एसपी प्रशांत वाघुंडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असल्याची माहिती आहे.
इमरानच्या मृतदेहाचे जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर मृत्यूमागील नेमकी परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

