सांगली प्रतिनिधी
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिपाई पदाच्या ७९ जागांसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, ३९५ उमेदवार मुलाखतीच्या पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवर याबाबतची माहिती पाठविण्यात आली आहे. त्यामुळे आता मुलाखतीचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
शिपाई पदाच्या ७९ जागांसाठी बँकेकडून भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या पदांसाठी तब्बल ४ हजार ४८९ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३ हजार ७३३ उमेदवारांनी ६ सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा दिली, तर ७५६ उमेदवार परीक्षेला गैरहजर राहिले. सांगली शहरातील पाच आणि आष्टा येथील एका केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात आली होती.
भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेला ७० गुण, तर मुलाखतीला ३० गुणांचे महत्त्व देण्यात आले आहे. एका पदासाठी पाच उमेदवार या प्रमाणात मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड करण्याचे बँक प्रशासनाचे नियोजन आहे. त्यानुसार ७९ पदांसाठी ३९५ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत.
लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पात्र उमेदवारांना ई-मेलद्वारे माहिती देण्यात आली आहे. मात्र, मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण याबाबतचे अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. बँक प्रशासनाकडून पुढील टप्प्याची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांचे आता मुलाखतीच्या वेळापत्रकाकडे लक्ष लागले आहे.

