सांगली प्रतिनिधी
सांगली : वाळवा तालुक्यातील एका निवासी स्पर्धा परीक्षा अकॅडमीत शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अकॅडमीचा संस्थापक काशीनाथ रामचंद्र नांगरे आणि त्याची पत्नी मनीषा काशीनाथ नांगरे (दोघे रा. गोटखिंडी, ता. वाळवा) यांच्याविरोधात आष्टा पोलिस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काशीनाथ नांगरे याला अटक केली असून त्याची पत्नी मनीषा नांगरे फरार आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, ११ जून २०२६ पासून अकॅडमीत निवासी शिक्षण घेणाऱ्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील तीन अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत हा प्रकार वारंवार घडत होता. रात्री मुली झोपेत असताना अकॅडमीचा संस्थापक काशीनाथ नांगरे त्यांच्याजवळ जाऊन लैंगिक अत्याचार व विनयभंग करत असल्याचा आरोप आहे. या प्रकाराची माहिती पीडित विद्यार्थिनींनी अकॅडमीतील संबंधित मॅडम तसेच नांगरे याची पत्नी मनीषा हिला दिली होती.
मात्र, पीडित मुलींना मदत करण्याऐवजी मनीषा नांगरे हिने हा प्रकार कोणाला सांगू नका, अन्यथा तुमच्या शाळेचे नुकसान करू, अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी काही काळ हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. अखेर त्यांनी धाडस करून आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर संतप्त पालकांनी आष्टा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारीची दखल घेत आष्टा पोलिसांनी काशीनाथ नांगरे आणि मनीषा नांगरे यांच्याविरोधात पोक्सोसह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला. काशीनाथ नांगरे याला पोलिसांनी अटक केली असून मनीषा नांगरे हिचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, निवासी अकॅडमीत अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत घडलेल्या या प्रकारामुळे सांगली जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. निवासी शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा संस्थांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

