विटा : प्रदीप जोशी
सांगली : विटा नगरपरिषदेच्या वतीने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शहरातील ४०२ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी ४ हजार ५०० रुपये याप्रमाणे एकूण १८ लाख ९ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांना आर्थिक आधार मिळणार आहे.
नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा पाटील, उपसभापती शीला लिपारे, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील तसेच सर्व सभापती व नगरसेवकांच्या उपस्थितीत अनुदान वितरणाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा काजल म्हेत्रे म्हणाल्या की, दिव्यांग बांधवांची दीपावली आनंदात जावी आणि सणासुदीच्या काळात त्यांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने अनुदान देण्यात आले आहे. दिव्यांगांच्या हितासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद कायम प्रयत्नशील राहील.
उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी सांगितले की, महिला व बालकल्याण विभागाने राज्य शासनाच्या अनुदानाचा लाभ दिव्यांगांना दिवाळीपूर्वी मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले. ४०२ लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर प्रत्येकी ४ हजार ५०० रुपये जमा होत असल्याचा आनंद आहे. दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे आणि शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालकल्याण सभापती अपर्णा पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन नितीन चंदनशिवे यांनी केले. अनुदानामुळे दिव्यांग लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


