सांगली प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या मिरज शहरातील स्वागत कमानींच्या तब्बल ४५ वर्षांच्या परंपरेला यंदाही उजाळा मिळाला आहे. मात्र, यंदाच्या कमानींना धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांसोबतच राजकीय रंग चढल्याचे चित्र आहे. मिरवणूक मार्गावर ठाकरेसेना आणि शिंदेसेनेकडून समोरासमोर उभारण्यात आलेल्या कमानींमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
ठाकरेसेनेने उभारलेल्या कमानीवर ‘गद्दार खंडोजी खोपडे’ या विषयावरील देखावा साकारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज खंडोजी खोपडे याला शासन करीत असल्याचे या देखाव्यातून दाखविण्यात आले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदेसेनेच्या कमानीवर दिशा सालियन आणि सुशांत राजपूत यांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या असून, ‘आम्हाला न्याय द्या’, असा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही कमानी मिरज शहरातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
मिरजच्या विसर्जन मिरवणूक मार्गावर दरवर्षी विविध सामाजिक, धार्मिक आणि ऐतिहासिक विषयांवर आधारित भव्य स्वागत कमानी उभारल्या जातात. यंदाही अनेक संस्थांनी आकर्षक आणि वैविध्यपूर्ण विषयांची निवड केली आहे. हिंदू एकता आंदोलनाच्या कमानीवर स्वामी समर्थांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. किसान चौकातील मराठा महासंघाच्या कमानीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांची प्रतिमा साकारण्यात आली आहे.
विश्वशांती मंडळाच्या कमानीवर महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. स्टेशन रोडवरील एकता सांस्कृतिक व क्रीडा मंडळाची कमान सामाजिक विषयावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी चौक गणेश मंडळाच्या कमानीवर आदिवासी योद्धा बिरसा मुंडा यांची प्रतिमा असून, विश्वश्री मंडळाच्या कमानीवर बाबा महाकाल यांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. विविध संस्थांनी आपल्या कमानींच्या माध्यमातून सामाजिक संदेश, ऐतिहासिक संदर्भ आणि धार्मिक श्रद्धा यांचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न केला आहे.
मिरजेतील स्वागत कमानींची ही परंपरा १९८३ मध्ये हिंदू एकता आंदोलन संघटनेने सुरू केली. सुरुवातीला मोजक्या कमानींपासून सुरू झालेली ही परंपरा पुढे शहराच्या गणेशोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग बनली. गेल्या चार दशकांहून अधिक काळात विविध मंडळे, सामाजिक संस्था आणि राजकीय संघटनांनी या परंपरेत सहभागी होत आपापल्या कल्पकतेनुसार कमानी उभारल्या आहेत.
विविध मंदिरांच्या प्रतिकृती, देवी-देवतांच्या प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह विविध थोर महापुरुषांचे जीवनकार्य आणि सामाजिक संदेश कमानींच्या माध्यमातून मांडले जातात. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीसोबतच या कमानी पाहण्यासाठीही नागरिकांची गर्दी होत असते.
यंदा हिंदू एकता आंदोलन, शिवसेना, मराठा महासंघ, विश्वशांती मंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एकता मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी चौक गणेश मंडळ, शिंदेसेना यांच्यासह विविध संस्था आणि मंडळांनी कमानी उभारल्या आहेत. धार्मिक आणि ऐतिहासिक विषयांसोबत सामाजिक प्रश्नांनाही यंदा स्थान देण्यात आले आहे.
मात्र, ठाकरेसेना आणि शिंदेसेनेच्या कमानींवरील विषयांमुळे यंदाच्या गणेशोत्सवाला राजकीय चर्चेची किनार मिळाली आहे. उत्सवाच्या वातावरणात या कमानी नागरिकांचे आणि राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेत असून, विसर्जन मिरवणुकीदरम्यान या कमानी विशेष चर्चेत राहण्याची शक्यता आहे. मिरजच्या पारंपरिक गणेशोत्सवातील कलात्मक आणि सामाजिक अभिव्यक्तीला यंदा राजकीय संदेशांची जोड मिळाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

