मुंबई प्रतिनिधी
मुंबई : लंडनमधील हिथ्रो विमानतळावर एअर ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणेत अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. विमानांची उड्डाणे १० ते १२ तास उशिराने होत असून, अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या गोंधळाचा फटका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही बसला आहे. पुरस्कार सोहळ्यासाठी लंडनला गेलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील सहा अधिकाऱ्यांचे विमान हिथ्रो विमानतळावर उतरू न शकल्याने स्वित्झर्लंडमधील झ्युरिक विमानतळाकडे वळवण्यात आले. त्यामुळे हे सहा अधिकारी सध्या झ्युरिकमध्ये अडकले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील ओएसडी आणि फोटोग्राफरसह सहा अधिकारी पुरस्कार सोहळ्यासाठी लंडनला रवाना झाले होते. मात्र, हिथ्रो विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या विमानाला लंडनमध्ये उतरण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे विमानाचे लँडिंग स्वित्झर्लंडमधील झ्युरिक विमानतळावर करण्यात आले. परिणामी हे अधिकारी झ्युरिकमध्येच अडकून पडले आहेत.
दरम्यान, या अधिकाऱ्यांना झ्युरिकहून लंडनला आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आहे. लंडनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी सातच्या सुमारास त्यांना लंडनला आणण्याची व्यवस्था केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने प्रवास करत असून त्यांचे विमान नियोजित वेळेनुसार असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रिटनमधील एअर ट्रॅफिक कंट्रोलची प्रमुख संस्था असलेल्या एनएटीएसच्या यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने हवाई वाहतुकीचा मोठा खोळंबा निर्माण झाला. या बिघाडामुळे ब्रिटनमधील १५ हून अधिक प्रमुख विमानतळांवरील विमानसेवेवर परिणाम झाला असून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली, तर असंख्य उड्डाणांना विलंब झाला. त्यामुळे हजारो प्रवाशांना विमानतळांवर ताटकळत राहावे लागले.
या तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल एनएटीएस प्रशासनाने प्रवाशांची माफी मागितली आहे. यंत्रणेतील तांत्रिक त्रुटी दूर करून विमानसेवा सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. हिथ्रो विमानतळावरील या तांत्रिक गोंधळामुळे जगभरातील हवाई वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे चित्र आहे.

