धाराशिव प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि रखडलेल्या सिंचन प्रकल्पांच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवारी धाराशिव जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह सत्तेतील आमदारांवर जोरदार टीका केली.
धाराशिव जिल्ह्यातील सुकलेल्या सोयाबीन पिकांची तसेच रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर दानवे यांनी सरकारच्या धोरणांवरही निशाणा साधला. “धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून तुम्हाला महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिले. मात्र, तुम्ही गद्दारी केली. आता मुख्यमंत्र्यांकडे जा आणि जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, अशी मागणी करा,” असा थेट हल्लाबोल दानवे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर केला.
पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना यापुढे सोडणार नसल्याचा इशाराही दानवे यांनी दिला. “तुम्ही पक्षाशी गद्दारी केली तेव्हाच शिवसैनिकांनी तुझ्या तोंडाला काळ फासलं पाहिजे होतं. यापुढे भगव्याची आणि बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो, पक्षाशी गद्दारी करणाऱ्याला सोडणार नाही,” असे दानवे म्हणाले.
दरम्यान, पावसाने खंड दिल्याने सोयाबीनसह अन्य पिकांवर परिणाम झाला असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. यावर बोलताना कृत्रिम पाऊस पाडणे शक्य नसल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. “कृत्रिम पाऊस पाडणे शक्य असते तर सरकारने दुष्काळावर खर्च करण्याऐवजी त्यावरच खर्च केला असता,” असे ते म्हणाले.
धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळ, सिंचन प्रकल्पांची रखडलेली कामे आणि शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे गटाने केलेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच अंबादास दानवे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि सत्ताधारी आमदारांवर केलेल्या आक्रमक टीकेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

