सातारा प्रतिनिधी
सातारा : कठीण आणि आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावत असताना पुण्यातील निवृत्त शास्त्रज्ञाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. संजय कदम (वय ६५) असे मृत धावपटूचे नाव आहे. ते पुण्यातील सी-डॅकचे निवृत्त शास्त्रज्ञ होते. रविवारी ही घटना घडली.
कदम यांनी २१ किलोमीटरच्या स्पर्धेतील सुमारे १७ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले होते. अंतिम टप्प्यात असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते रस्त्यावर कोसळले. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याची माहिती आहे.
घटनेनंतर मॅरेथॉनसाठी तैनात असलेल्या वैद्यकीय पथकाने तत्काळ धाव घेत प्राथमिक उपचार सुरू केले. डॉ. रियाझ मुजावर यांनी त्यांना सीपीआर दिला. त्यानंतर कदम यांना तातडीने साताऱ्यातील पल्स सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. कौशिक पाटील आणि त्यांच्या पथकाने उपचार सुरू केले. तपासणीमध्ये त्यांच्या मुख्य रक्तवाहिनीत अडथळा असल्याचे आढळून आले. त्यानंतर डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी केली. मात्र, प्रकृती स्थिर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही दुपारच्या सुमारास त्यांना पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.
संजय कदम यांचे चुलत भाऊ अनिल कदम यांनी सांगितले की, घरात संजय यांना प्रेमाने ‘तानाजी’ म्हणून हाक मारली जात असे. वयाच्या ६५ व्या वर्षीही त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा होता. वाढत्या वयामुळे लांब पल्ल्याच्या धावण्याचा वेग कमी करण्याचा सल्ला कुटुंबीयांकडून त्यांना अनेकदा देण्यात आला होता. मात्र, धावणे हा त्यांचा आवडता छंद होता आणि त्यातून त्यांना मोठा आनंद मिळत असे. अखेरच्या क्षणापर्यंत ते सक्रिय होते.
कदम यांच्या ९५ वर्षीय मातोश्री शांता कदम या आजारी असून व्हेंटिलेटरवर आहेत. मोठ्या मुलाच्या निधनाची बातमी कळल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. संजय कदम यांच्या पार्थिवावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे आयोजन २०१२ पासून दरवर्षी केले जाते. २१.१ किलोमीटरची ही स्पर्धा देशातील आव्हानात्मक मॅरेथॉनपैकी एक मानली जाते. सातारा शहरातून सुरू होणारी ही स्पर्धा कास पठाराच्या दिशेने चढणीचा मार्ग पार करून पुन्हा शहराकडे उतरते. समुद्रसपाटीपासून सुमारे ६५० मीटर उंचीवरून सुरू होणाऱ्या या मार्गात चढ-उताराचे आव्हान धावपटूंसमोर असते. यंदा स्पर्धेचे १५ वे वर्ष असून देशभरातून सुमारे ८ हजार ८०० हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता.

